इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
मुंबईः पावसाळी अधिवेशन सुरु असताना रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आला होता. त्यामुळे कोकाटेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी जोर धरत होती. दरम्यान, माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषी खात्याचा कार्यभार काढून घेण्यात आला आहे. त्यांच्या जागी आता दत्तात्रय भरणे यांना राज्याचे नवे कृषीमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. कोकाटे यांचा राजीनामा घेण्यात आला नसून, त्यांना क्रीडा व युवक कल्याण विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यामुळे त्यांचे मंत्रिपद अबाधित राहिले आहे.
नवनियुक्त कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या खातेबदलापूर्वीच सूचक विधान केले होते. “बारामतीकर न मागता सगळं देतात,” असे म्हणत त्यांनी आपल्याला महत्त्वाचे खाते मिळण्याचे संकेत दिले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या विषयावर सविस्तर चर्चा केली होती. या बैठकीनंतरच कोकाटे यांच्याकडून कृषी खाते काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या संदर्भात शासनाने अधिसूचनाही जारी केली आहे. दरम्यान, भरणे यांची कृषीमंत्रीपदी नियुक्ती ही त्यांच्यासाठी एक मोठी संधी मानली जात आहे.