इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
जालना : परतूरचे भाजप आमदार बबनराव लोणीकर यांचे एक वादग्रस्त वक्तव्य सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सरकारला ट्रोल करणाऱ्या तरुणांना उत्तर देताना बबनराव लोणीकर यांनी असे काही वक्तव्य केले आहे की, त्यांना आता टीकांचा सामना करावा लागत आहे.
एका कार्यक्रमादरम्यान लोणीकर यांनी सोशल मीडियावर सरकारला आणि आपल्याला ट्रोल करणाऱ्या तरुणांवर लक्ष करत म्हंटले की, ‘तरूण पोरं कुचरवट्या बसतात अन् म्हणतात सरकारने काय केलं? तुझ्या गावात जे आलं ना, ते बबनराव लोणीकरनेच 25 वर्षांत दिलं. नरेंद्र मोदींनी सहा हजार रूपये तुझ्या बापाला पेरणीला दिले. तुझ्या आईच्या, बायकोच्या, बहिणीच्या नावावर लाडक्या बहिणीचे पैसे आले. तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे आहेत. तुझ्या पायातले बुट, चप्पल आमच्यामुळे आहेत. तुझ्या हातातील मोबाइलचं डबडं देखील आमच्याच सरकारमुळे आहे. आमचंच घेतो, अन् आमच्याच तंगड्या वर करतो. आमच्यावर लिहितो. तुमच्या आमदाराच्या काळात असं काय होतं का? असा देखील सवाल लोणीकरांनी केलाय. त्यांच्या याच वक्तव्याचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.
जालना जिल्ह्यातील परतूर येथे हर घर सोलर योजनेच्या शुभारंभकार्यक्रमात लोणीकर ते बोलत होते. त्यांच्या या वक्तव्याने ते आता विरोधकांच्या निशाण्यावर आले असून, त्यांच्यावर सडकून टीका केली जात आहे. दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन वाद निर्माण होणार हे नक्की.
दरम्यान, लोणीकर यांच्याकडून त्यांच्या या वक्तव्यावर अजून कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.