इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
मुंबई : हिंदी भाषेच्या सक्तीविरोधातील लढ्यात यश मिळाल्यानंतर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांचा आज एकत्रित ‘विजय मेळावा’ होणार आहे. या मेळाव्यात तब्बल १९ वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र येत आहेत. अशातच ठाकरे बंधूंना एकाच व्यासपीठावर पाहण्याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. नाशिक, ठाणे, नवी मुंबईसह महाराष्ट्रातून विजयी मेळाव्यासाठी मनसैनिक आणि शिवसैनिक, मराठी कलाकार, अनेक मान्यवर नेते या मेळाव्यासाठी रवाना झाले आहेत.
आज सकाळी १० वाजल्यानंतर या मेळाव्याला सुरूवात होणार असून, या मेळाव्याच्या निमित्ताने महाराष्ट्रात नवी युती होणार का? याकडेही आता सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. उद्धव ठाकरे तसेच राज ठाकरे यांनीही वेळोवेळी युतीवर संकेत दिले आहेत. अशातच आता आजच्या या मेळाव्यात कोणती मोठी घोषणा होती का? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असेल.
विजयी मेळाव्याची लगबग मुबंईत सुरु असून, दादर, शिवाजी पार्कसह मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे. आवाज मराठीचा, कोणताही झेंडा नाही फक्त मराठीचाच अजेंडा असा बॅनरवर उल्लेख करण्यात आला आहे.
दरम्यान, काल पुण्यातील एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘जय हिंद, जय महाराष्ट्र’ सोबतच ‘जय गुजरात’चाही नारा दिला होता. एकीकडे राज्यात भाषा वाद आणि दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदेंकडून जय गुजरातची घोषणा यावरुन आता राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, एकनाथ शिंदेंवर टीका होताना दिसत आहे. अशातच आज ठाकरे बंधू यावर काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.