इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
दौंड : दौंड शहरातील कुंभार गल्ली परिसरात एका दुकानात काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून मालकाने तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करत विश्वासघात केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संबंधित तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून पीडितेच्या विश्वासाचा गैरफायदा घेत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला, असा आरोप आहे. या घटनेमुळे स्थानिक व्यापारी वर्ग आणि नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून दौंड पोलिसांनी जय कमल मोटवाणी (वय २५, रा. जनता कॉलनी, बंगला साईड, दौंड) याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (POCSO) अंतर्गत आणि संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणात त्वरित कारवाई करत आरोपीला शुक्रवारी रात्री अटक केली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ऑगस्ट २०२४ पासून सुरू होऊन काही आठवड्यांपूर्वीपर्यंत सुरू होती. आरोपीने पीडिता अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही तिला लग्नाचे आश्वासन दिले होते. या आधारे तिचा विश्वास जिंकून वारंवार संपर्क ठेवण्यात आला, असे पोलिस तपासात समोर आले आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी काही काळ फरार होता. मात्र, दौंड पोलिसांनी सतर्कता दाखवत त्याला शिताफीने ताब्यात घेतले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रुपेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.