इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
मुंबईः जात प्रमाणपत्र किंवा जातवैधता प्रमाणपत्रासाठी शासकीय कार्यालयात हेलपाटे मारणे, प्रमाणपत्रासाठी लांबच लांब रांगा आणि कागदपत्रांची किचकट जुळवाजुळव करावी लागते, यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले होते. हे चित्र बदलणार असून महाराष्ट्र सरकारने जात प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन प्रणालीला मंजुरी दिली आहे, ज्यामुळे आता घरबसल्या एका क्लिकवर जात प्रमाणपत्र काढता येणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 100 दिवसांत ऑनलाइन प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी कृती आराखडा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. अर्जदार ऑनलाइन अर्ज भरून जात प्रमाणपत्र मिळवू शकतील. ही प्रणाली जलद आणि वापरकर्त्यासाठी सोपी असणार आहे.
बार्टी आणि TCS यांनी संयुक्तपणे ऑनलाइन प्रणाली विकसित करत आहे. प्रणालीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित फिचर्स असल्यामुळे अर्जदाराची संपूर्ण माहिती जसे कि, नाव, वडील किंवा पतीचे नाव आणि आधार कार्डमधील मूळ पत्ता या सर्व गोष्टी एआयद्वारे तपासल्या जाणार आहे.
अर्ज भरताना कोणत्याही अडचणी आल्यास त्यासाठी स्मार्ट यूजर इंटरफेस उपलब्ध असणार आहे. त्यामुळे आता काही तासांत अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. दरम्यान, या प्रणालीमुळे मानवी हस्तक्षेप कमी झाल्यास भ्रष्टाचाराची शक्यता कमी असणार आहे. या नवीन ऑनलाइन प्रणालीमुळे नागरिकांचा वेळ आणि श्रम वाचेल आणि त्यांना आवश्यक असलेली प्रमाणपत्रे वेळेत मिळतील. नवीन ऑनलाइन प्रणालीमुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे.