इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
मुंबई : भारतीय हवामान खात्याने (IMD) आज महाराष्ट्रातील अनेक भागांत विजांसह मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तर मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, पुणे आणि नाशिकमध्ये मेघगर्जनेसह ५०-६० किमी/तास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. अशातच नागरिकांना सावध राहण्याचे आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
IMD दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रातील चक्रीवादळासारख्या परिस्थितीमुळे राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. काही ठिकाणी ६०-१०० मिमी पाऊस पडण्याची शक्यता आहे, ज्यामुळे खालच्या भागात पाणी साचण्याचा धोका आहे. विदर्भातील नागपूर, अमरावती, आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला असून, कोकणातील रायगड आणि रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईतही यलो अलर्ट असून, रात्री पावसाचा जोर वाढू शकतो.
दरम्यान, प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवली आहे. NDRF आणि BMC यांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच नागरिकांनी पाणी साचलेल्या ठिकाणी जाणे टाळावे आणि आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.