इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
कोंढरी : कोंढरी हद्दीत भोर महाड मार्गावरील रस्ता रुंदी करण्याच्यासुरू असलेल्या ठिकाणी बांधण्यात आलेली संरक्षण भिंत शुक्रवारी (ता.२६) कोसळली होती. ती पुन्हा बांधण्याचे काम शुक्रवारी (ता.२८) पावसात सूरु असताना ते बांधकाम पुन्हा सायंकाळी सहाच्या दरम्यान कोसळले आहे. पहिल्याच पावसात केलेले बांधकाम ढासळल्याने या कामाच्या दर्जाबाबत स्थानिक नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
हिडोंशी परिसरात रस्ता रुंदीकरणाचे काम सुरु असताना धरणाच्या बाजूला व डोंगराच्या बाजूला आवश्यक असेल तेथे संरक्षण भिंती व कठडे बांधून त्यानंतर काँक्रिटीकरण केले जात आहे. परंतु या बांधलेल्या संरक्षण भिंती व कठडे यांचे बांधकाम करताना पाण्याचा वापर खुपच कमी केला असल्याच्या तक्रारी वारंवार स्थानिक नागरिकांकडून करण्यात आल्या होत्या. परंतू ठेकेदार नेहमीच अशा याकडे दुर्लक्ष करीत आलेले आहेत. त्यातूनच कोंढरी गावात जाणाऱ्या जून्या रस्त्याच्या फाट्याजवळ सिमेंट काँक्रिटचा एक थर झालेला असताना तेथे धरणाच्या बाजूला बांधण्यात आलेली संरक्षण भिंत कोसळली आहे.
धरणाच्या बाजुला पुर्णतः मातीचा भरावा असून या संरक्षण भिंतीचे बांधकाम दर्जेदार होणे गरजेचे आहे. संरक्षण भिंत ढासळल्यावर काँक्रिटीकरणाच्या थराखाली पोकळी निर्माण झाल्याचे दिसून येत असल्याने हे ठिकाण भविष्यात धोकादायक झाले असून संबधित अधिकारी यांनी येथील कामाची पाहणी करुन योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.