इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : शहरात दिवसेंदिवस लुटमारीच्या घटना वाढत चालल्या आहेत. या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, नागरिकांनी शहारत पोलीस बंदोबस्त वाढवण्याची मागणी केली आहे. नुकतीच ट्रॅव्हल्समध्ये दरोडा टाकल्याची घटना घडली असून, पुन्हा एकदा सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
भोसरीहून बीडला जाणारी ट्रॅव्हल्स प्रवासी घेण्यासाठी बकोरी फाटा येथील समृद्धी लॉजसमोर थांबली असताना मध्यरात्री चौघांनी या ट्रॅव्हल्सवर दरोडा टाकला. तिघे जण बसमध्ये जबरदस्तीने घुसले व प्रवासी आणि बसचालकाला मारहाण करुन त्यांना लुबाडून फरार झाले.
याबाबत भाऊसाहेब युवराज मिसाळ (वय २६, रा. मयुर नायगाव, ता. पाटोदा जि. बीड) या बसचालकाने वाघोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, पोलिसांनी चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच पुढील तपास सुरु केला आहे.
बसचालकाने दिलेल्या तक्रारीनुसार, युवराज ट्रॅव्हल्सचे मालक युवराज भोसले (रा. शाहुनगर, बीड) यांच्याकडे फिर्यादी हे चालक म्हणून नोकरीला आहेत. ते बस घेऊन गुरुवारी रात्री ८ वाजता भोसरी हून बीड जाण्यासाठी निघाले. ते प्रवासी घेत-घेत पुढे निघत असताना रात्री पावणे बारा वाजता पुणे-अहिल्यानगर रोडवरील बकोरी फाटा येथील समृद्धी लॉजींग समोर थांबले असताना काही अज्ञात बसमध्ये घुसले व त्यांनी प्रवाशांकडून पैसे मागण्यास सुरुवात केली. तसेच बस चालक व कंडक्टर यांना मारहाण करून त्यांच्याकडून पैसे घेतले व एका स्वीफ्ट कार मध्ये बसून अहिल्यानगरच्या दिशेने निघून गेले.