इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
सोलापूरः सोलापूर शहरातील सिव्हिल रुग्णालयात एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रुग्णालयाच्या खिडकीच्या ग्रीलमध्ये अडकून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ व्यक्त केली जात आहे. मृतावस्थेत आढळलेल्या या व्यक्तीचे हात एका ग्रीलवर, पाय दुसऱ्या ग्रीलवर आणि डोके खिडकीच्या वरच्या भागात अडकलेले होते. अशा भयावह स्थितीत व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मयत व्यक्तीचे नाव पप्पू अण्णा भंडारी (वय ५०) असून, ते मूळचे धाराशिव जिल्ह्यातील भूम येथील रहिवासी होते. ज्या दिवशी ही घटना घडली, त्या दिवशी ते सिव्हिल रुग्णालयात उपचार घेत असलेल्या आपल्या भाच्याला भेटण्यासाठी आले होते. मात्र, एका विचित्र परिस्थितीत खिडकीत अडकून त्यांचा जीव गेला. या अनपेक्षित मृत्यूबद्दल शहरात सर्वत्र चर्चा सुरू आहे.
या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेचा सखोल तपास सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, ५० वर्षीय पप्पू भंडारी यांचा भाचा सिव्हिल रुग्णालयात दाखल होता. त्याला भेटायला आले असता, भंडारी दारूच्या नशेत होते. त्यामुळे सुरक्षा रक्षकांनी त्यांना बाहेर काढले. भाच्याला भेटता न आल्याने ते परतले. मात्र, रविवारी सकाळी सात वाजता ते खिडकीतील ग्रीलमध्ये डोके अडकलेल्या अवस्थेत मृतावस्थेत आढळले.
पोलिसांनी व्यक्त केलेल्या प्राथमिक अंदाजानुसार, सुरक्षा रक्षकांनी बाहेर काढल्यानंतर भंडारी यांनी इमारतीच्या खिडकीतून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला असावा. याच प्रयत्नात त्यांचे डोके ग्रीलमध्ये अडकले असावे दारूच्या नशेत असल्याने ते स्वतःला वाचवू शकले नाहीत यातच त्यांचा मृत्यू झाला असावा. तथापि, भंडारी यांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला, याचा अधिक तपास सोलापुरातील सदर बाजार पोलीस करत आहेत.