Wednesday, October 30, 2024
Homeक्राईम न्यूजभाद्रपदी बैलपोळा निमित्त यवत आठवडे बाजारपेठ सजली राहुलकुमार अवचट

भाद्रपदी बैलपोळा निमित्त यवत आठवडे बाजारपेठ सजली राहुलकुमार अवचट

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

यवत : दौंड तालुक्यात साजरा होणाऱ्या भाद्रपदी बैलपोळा निमित्त यवत येथील आठवडे बाजारपेठ सजली आहे. बैलपोळा सणानिमित्त बैलांना सजावटीसाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या साहित्याच्या विक्रीसाठी यवत येथील शुक्रवारी भरणारी आठवडे बाजारपेठ सजली, मात्र सजावटीसाठी साहित्याची मागणी कमी असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

आज यवत येथील आठवडे बाजार असून गुरुवारी रात्रीच अनेक व्यापारी बैल व जनावरांच्या सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्याची दुकाने घेऊन यवत परिसरात मोठ्या संख्येने दाखल झाले होते. परंतु आज सकाळी बैल बाजार परिसरात तुरळक गर्दी पाहण्यास मिळाली. पुणे जिल्ह्यातील अनेक भागात भाद्रपदी बैलपोळा सण २ ऑक्टोबर रोजी साजरा होत असून आज खरेदीसाठी शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात गर्दी करतील अशी अपेक्षा आलेल्या व्यापाऱ्यांनी वक्त केली होती.

यवत आठवडे बाजार परिसरात सजावट साहित्याची विक्री करणारी दुकाने अनेक व्यापाऱ्यांनी थाटली असून यांत्रिक बैल, गायी, म्हशी, कालवडी, शेळ्या-मेंढ्यांच्या सजावटीसाठी लागणारे शेल, दृष्टमाळ, घुंगरमाळ, बाशिंग, गोंडे, वेसण, म्होरक्या, कवडीमाळ, मनिमाळ, चाबूक, शेंबी, रंगीत बेगडे, हिंगूळ (रंग), कासरा आदी साहित्य खरेदीस शेतकऱ्यांनी काही प्रमाणात सुरुवात केल्याचे दिसून आले.

सजावट साहित्याच्या दरामध्ये काही प्रमाणात वाढ झालेली असली तरी शेतकऱ्याकडून खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे. बैलांनी वर्षभर शेतात केलेल्या काबाडकष्टाची उतराई म्हणून शेतकरीवर्ग परंपरेनुसार बैलपोळा सण साजरा करत बैलांची ऋण व्यक्त करत असतो. अलिकडच्या काळात बैलांची संख्या कमी झालेली असली, तरी शेतकऱ्यांचा बैलपोळा सणाचा उत्साह मात्र टिकून असल्याचे यवत येथील शेतकरी बबन सोनबा दोरगे, चंद्रकांत दोरगे, अशोक गायकवाड, विक्रम दोरगे यांनी सांगितले.

सध्या सर्वत्र समाधानकारक पाऊस पडला असल्याने यंदा बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा होईल, परंतु महागाईने व शेतीमालाला बाजार भाव शेतकरी वर्गामध्ये काहीसा निरुत्साह दिसून येत आहे. अनेक गावांमध्ये पारंपरिक पद्धतीने पोळा सण साजरा होणार की नाही? अशी स्थिती निर्माण झाली आहे. दौंड तालुक्यात बुधवारी सर्वत्र बैलपोळा सण असून तालुक्यात पारंपरिक पद्धतीने शेतकरी आठवडाभर तयारी करून मोठ्या उत्साहात सण साजरा करतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments