इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : राज्यभरात अपात्र रेशन कार्ड शोधण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. या तपासणी मोहिमेचा उद्देश अपात्र आणि बनावट कार्डधारकांना ओळखणे आणि त्यांचे रेशनकार्ड तात्काळ रद्द करणे हा आहे. त्यानुसार आता सरकारच्या रेशनवर डल्ला मारणाऱ्या लाखो बोगस लोकांवर डिजिटल स्ट्राईक झाला आहे. एकाच फटक्यात राज्यातील 18 लाख रेशनकार्ड रद्द करण्यात आले आहेत. गलेलठ्ठ पगार, सरकारी नोकरदार, व्यापारी, व्यावसायिक, श्रीमंतांची नावे या मोहिमेमुळे रद्दबातल होत आहे.
अनेक सरकारी अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, विविध खासगी कंपन्यांतील गलेलठ्ठ पगारदार, व्यापारी, व्यावसायिकांकडे सुद्धा रेशनकार्ड आहेत. त्याआधारे दर महिन्याला ते धान्य उचलतात. हे धान्य ते विविध गृहउद्योग, कुक्कुटपालन आणि इतर ठिकाणी विक्री करत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांकडून होतो. त्यामुळे सरकारी अन्नधान्य योजनेला लागलेली ही सुखवस्तू वाळवी पोखरत असल्याचे समोर आले. त्यानंतर आधार कार्ड सहाय्याने ई-केवायसी मोहिम राबवण्यात येत आहे. त्यात अनेक बोगस रेशनकार्डधारक समोर आले आहेत. त्यांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. त्यांचे रेशनकार्ड रद्द करण्यात आले आहे. आता या मोहिमेत अजून मोठ्या प्रमाणात रेशनकार्ड रद्द होणार असल्याचे समोर येत आहे.
१८ लाख रेशन कार्ड रद्द
या मोहिमेत आतापर्यंत राज्यात १८ लाख रेशन कार्ड रद्द करण्यात आले आहे. दीड कोटींहून अधिक कार्डधारकांची ई-केवायसी प्रलंबित आहे. आधार लिंकसाठी केंद्र सरकारच्या ई-केवायसी मोहिमेत राज्यातील १७.९५ लाख रेशन कार्ड रद्द झाल्याचे आकेडवारीत समोर आले आहे.