इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः महाराष्ट्रात आता नोंदणीकृत डॉक्टरांसाठी क्यूआर कोडचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे, ज्यामुळे नागरिकांना डॉक्टरांची खरी ओळख, पात्रता आणि परवान्याची माहिती मोबाईलवर सहज तपासता येणार आहे. विधानसभेत झालेल्या चर्चेनंतर राज्यातील वाढत्या बोगस डॉक्टरांच्या समस्येवर आळा घालण्यासाठी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
गेल्या 5 वर्षांत 391 बोगस डॉक्टरांवर गुन्हे दाखल होऊनही केवळ 2 जणांना शिक्षा झाल्याची आकडेवारी लक्षात घेता, ‘नो युअर डॉक्टर’ ही प्रणाली तातडीने लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंबंधीचा आदेश पुढील 2 आठवड्यांत जारी होईल.
प्रत्येक नोंदणीकृत डॉक्टरांनी त्यांच्या रुग्णालयात किंवा क्लिनिकमध्ये हा क्यूआर कोड असलेले कार्ड ठळकपणे प्रदर्शित करणे आता बंधनकारक असणार आहे. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने 11 फेब्रुवारी 2025 रोजी ही प्रणाली सुरू केली असली तरी, 2 लाख नोंदणीकृत डॉक्टरांपैकी केवळ 10,000 डॉक्टरांनीच आतापर्यंत यात ऐच्छिक नोंदणी केली आहे.
आता नोंदणी करणे सर्व डॉक्टरांसाठी सक्तीचे असणार आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने या निर्णयाचे स्वागत करत, यामुळे बोगस डॉक्टरांना निश्चितपणे आळा बसेल आणि प्रामाणिक डॉक्टरांवरील नागरिकांचा विश्वास वाढेल, असे मत व्यक्त केले.