इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः बुधवार पेठेत अमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करत मेफेड्रोन विकण्यासाठी आलेल्या एकाला अटक केली आहे. त्याच्याकडून १२ लाख १२ हजार रुपयांचे ५९ ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले आहेत. शरणप्पा नागप्पा कटिमणी (वय ३४ वर्ष, रा. दुगड शाळेजवळ, कात्रज, मूळ रा. भापर गल्ली, गुलबर्गा, कर्नाटक) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध अमली पदार्थ विक्री प्रतिबंध कायद्यान्वये (एनडीपीएस अॅक्ट) फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमली पदार्थ विरोधी पथक-२ बुधवार पेठेत गस्त घालत असताना आरोपी कटिमणी हा मेफेड्रोन (एमडी) अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गस्त घालणारे पोलीस कर्मचारी सय्यद साहिल नजीर शेख यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा रचून आरोपी कटिमणीला ताब्यात घेतले. ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे मेफेड्रोन आढळून आले. त्याच्याकडून १२ लाख १२ हजार रुपयांचे ५९ ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले.
दरम्यान, कटिमणीने मेफेड्रोन कोणाकडून आणले, आणि तो कोणाला विकणार होता. यादृष्टीने तपास पोलीस तपास करीत आहेत.
सदर कारवाई, गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहायक निरीक्षक नितीनकुमार नाईक, उपनिरीक्षक अस्मिता लाड, चेतन गायकवाड, मयूर सूर्यवंशी, साहिल शेख, उदय राक्षे, संदीप शेळके यांनी केली.