इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील पारवडी गावातील इंगळे वस्तीवर बुधवारी रात्री दहाच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली आहे. काकानेच पुतण्याचा जीव घेतल्याच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडालीये. कौटुंबिक वादातून काकाने आपल्या २४ वर्षीय पुतण्याची क्रूरपणे हत्या केली. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली असून, याचा पुढील तपास सुरु आहे.
नेमकं काय घडलं ?
जमिनीच्या वादातून ही घटना घडल्याचं समोर येत आहे. मृत तरुणाचे नाव सौरभ विष्णू इंगळे (वय २४) असे आहे. तर प्रमोद रामचंद्र इंगळे आणि रामचंद्र जगन्नाथ इंगळे अशी ताब्यात घेतलेल्यांची नावं आहेत.
पोलीस निरीक्षक वैशाली पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘सौरभने बाथरूम आपल्या जागेत बांधल्याचा दावा केला होता. यावरून इंगळे वस्तीवर सौरभ आणि आरोपी प्रमोद व रामचंद्र यांच्यात वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की, दोघांनी सौरभला बेदम मारहाण केली. त्यानंतर सौरभच्या चुलत भावांनी त्याला बारामतीतील रुग्णालयात नेले.
सौरभने पोलिसांना आपल्याला मारहाण झाल्याचे सांगितले होते. मात्र, रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याची प्रकृती खालावली आणि त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात मृत तरुणाचा चुलता आणि त्याचा मुलगा यांनीच हा गुन्हा केल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी प्रमोद इंगळे व रामचंद्र इंगळे या बापलेकाला ताब्यात घेतले.