इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : पुणे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असलेल्या हवालदाराच्या मुलाने वडिलांचे रिव्हॉल्व्हर घेऊन हवेत गोळीबार केल्याचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ त्याच्या मोठ्या मुलाने शूट केला आहे. तीन वर्षांपूर्वीचा हा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. याप्रकरणी वालचंदनगर पोलिसांनी पुणे ग्रामीण पोलीस दलातील हवालदारासह त्याच्या मुलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस हवालदार रमेश बाबूराव केकाण, पार्थ रमेश केकाण, अथर्व रमेश केकाण (रा. वाकड) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे यांनी वालचंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हवालदार रमेश केकाण पुणे ग्रामीण पोलिसांच्या मुख्यालयात नियुक्तीस आहेत. केकाण यांच्याकडे शस्त्र परवाना आहे. तीन वर्षांपूर्वी केकाण कुटुंबीय इंदापूर परिसरातील कळस गावातील सासूरवाडीत आले होते. त्यावेळी केकाण यांचा मुलगा पार्थने रिव्हॉल्वरमधून हवेत गोळीबार केला होता. हवेत गोळीबाराचे चित्रीकरण मोबाइलद्वारे केकाण यांचा मोठा मुलगा अथर्वने केले होते.
त्यानंतर तीन वर्षापूर्वीचा हा व्हिडिओ पार्थ केकाण याने आता सोशल मीडियावर अपलोड केला आहे. सोशल मीडियावरील हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने पोलिसांच्या लक्षात आले. त्यांनी त्याचा शोध घेतला असता तो इंदापूर तालुक्यातील कळस गावात व्हिडिओ शुट केल्याचे व पोलीस हवालदारांच्या मुलांनी केल्याचे समजले. पोलीस हवालदार केकाण यांनी मुलगा पार्थला रिव्हॉल्वर दिल्याचे तपासात उघड झाले. त्यानुसार हवालदारासह त्यांच्या दोन्ही मुलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक टेळकीकर तपास करीत आहेत.