इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः पुणे शहरात गेल्या काही काळात टोळीयुद्ध, वाहनांची तोडफोड, घरफोडी आणि कोयत्याचा वापर यांसारख्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याने पुणे पोलिसांनी (Pune Police) कडक पावले उचलली आहेत. पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार शहरभरात नाकाबंदी आणि कोम्बिंग ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे.
या मोहिमेंतर्गत संशयास्पद वाहनांची तपासणी, अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई, तसेच फरारी आणि सराईत गुन्हेगारांवर लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे. विशेष पथक, गुन्हे शाखा, वाहतूक विभाग आणि राज्य राखीव पोलीस बल यांचा यामध्ये सहभाग आहे. नाकाबंदी ठिकाणी शस्त्रसज्ज पोलिस तैनात असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी अधिक गस्त घालण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. वाहन तपासणी दरम्यान नागरिकांना त्रास होऊ नये, याकडेही पोलिसांनी विशेष लक्ष दिले आहे.
पोलिस नियंत्रण कक्षाच्या 112 क्रमांकावर येणाऱ्या तक्रारींवर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि मुलांच्या सुरक्षेला विशेष प्राधान्य दिले जात आहे.
गुन्हेगारी आकडेवारीनुसार पुणे शहरात दरवर्षी गुन्ह्यांची संख्या वाढत आहे. 2021 मध्ये 8,317 गुन्हे नोंदले गेले होते, तर 2024 च्या सप्टेंबरपर्यंत ही संख्या 12,954 वर पोहोचली आहे. ‘स्ट्रीट क्राइम’मध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येते.
शहरातील सुरक्षिततेसाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त राबविला असून, नागरिकांनी संशयास्पद हालचाली पोलिसांना तत्काळ कळवून सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.