इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः शहरातील आंबेगाव पठार भागात मंगळवारी (१५ जुलै) सकाळी भरदिवसा थार गाडीतून आलेल्या दोघांनी तब्बल ५० लाख रुपयांची रोकड बळजबरीने हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना घडली. ही धाडसी चोरी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
धाराशिव जिल्ह्यातील येडशी येथील अभिजीत पवार हे आपला मित्र मंगेश ढोणे याच्यासोबत पुण्यात आले होते. त्यांच्या जवळ ५० लाखांची रोख रक्कम होती, ही रक्कम पुण्यातील एका व्यक्तीकडे सुपूर्द करण्यासाठी आणली होती. १५ जुलै रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास बाबाजी पेट्रोल पंप परिसरातून हे दोघे पायी जात होते. त्यावेळी काळ्या रंगाच्या थार गाडीतून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी मंगेश ढोणे यांच्या हातातील बॅग हिसकावून पलायन करून आरोपी नवले पुलाच्या दिशेने फरार झाले.
घटनेनंतर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र, रात्री उशिरापर्यंत आरोपींचा शोध लागला नव्हता. या प्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.