इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः पुणे जिल्ह्यासह राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पालेभाज्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे पुण्यातील गुलटेकडी मार्केट यार्डात पालेभाज्यांची आवक निम्म्यावर आली असून, त्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर, हडपसर, उरळी कांचन, लोणी काळभोर, यवत यांसारख्या भागांत पालेभाज्यांचे मोठे उत्पादन घेतले जाते. याशिवाय, लातूर आणि नाशिकमधूनही कोथिंबीर येते. मात्र, पावसाच्या सततच्या हजेरीमुळे सर्वच भागांतून येणाऱ्या भाज्यांच्या प्रमाणात घट झाली आहे.
अचानक वाढलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पालेभाज्यांची काढणी होऊ शकली नाही, तर शेतातच भाज्या खराब झाल्या आहेत. त्यामुळे, शहरातील बाजारपेठांमध्ये चांगल्या प्रतीच्या पालेभाज्यांचा तुटवडा जाणवत आहे. एका दिवसात पालेभाज्यांचे भाव दुपटीने वाढले असून, किरकोळ बाजारात काही भाज्यांचे भाव 40 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या ताटातून पालेभाज्या गायब झाल्या आहेत.
बाजारपेठेत दाखल होणाऱ्या मालाच्या तुलनेत मागणी जास्त असल्याने, दर वाढले आहेत. पावसाने भिजलेल्या भाज्या 15 ते 20 रुपयांना, तर चांगल्या प्रतीच्या भाज्या 20 ते 40 रुपयांना विकल्या जात आहेत, अशी माहिती किरकोळ विक्रेत्यांनी दिली. तसेच, खरेदीदारही पावसाने भिजलेल्या भाज्या लवकर खराब होतात म्हणून कमी खरेदी करत आहेत. या परिस्थितीमुळे शेतकरी आणि ग्राहक दोघेही अडचणीत आले आहेत.