इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः शहरात बेकायदेशीरपणे ‘मेथाम्फेटामाइन’ गोळ्या विकणाऱ्या एका व्यक्तीला फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून तब्बल ५ लाख ७४ हजार रुपये किमतीच्या या गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. या गोळ्या डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय विकायला मनाई आहे, कारण त्या खूप शक्तिशाली आणि शरीराला हानी पोहोचवणारे मानले जातात. निशान हबीबमंडल (वय ४७, रा. बंगळूरु, कर्नाटक) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी गेल्या वीस वर्षांपासून आयात-निर्यातीचा व्यवसाय करत होता. या व्यवसायात नुकसान झाल्याने त्याने हे बेकायदेशीर काम केल्याचे पोलिसांना सांगितले आहे.
‘मेथाम्फेटामाइन’ ही गोळी डॉक्टर्स जास्त सक्रिय असणे (अतिक्रियाशीलता), नाइट फॉल किंवा लठ्ठपणा यासारख्या काही विशिष्ट आजारांवर उपचार म्हणून देतात, मात्र, काही जिममधील तरुण शरीर बनवण्यासाठी (बॉडी बिल्डिंग) याचा वापर करतात, तर काही व्यसनी लोक नशा करण्यासाठी याचा वापर करतात. ही गोळी खाल्ल्यावर मेंदूतील ‘डोपामाइन’ नावाचे रसायन मोठ्या प्रमाणात तयार होते. डोपामाइनमुळे मनात आनंद आणि समाधानाची भावना येते. स्वतःला आनंदी आणि उत्साही ठेवण्यासाठी काही लोक मेथाम्फेटामाइनचा वापर करतात. हळूहळू याची सवय लागून ते व्यसनात बदलते. पण याचा जास्त वापर केल्यास मृत्यूही होऊ शकतो.
पोलीस शिपाई गजानन सोनुने यांनी या प्रकरणी तक्रार दिली होती. त्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. पश्चिम बंगालमधून निशान हबीबमंडलने या गोळ्या पार्सलने मागवल्या होत्या आणि त्या विकण्यासाठी तो पुण्यात आला होता. तो पुण्यात या गोळ्या कोणाला विकणार होता याबद्दल अधिक माहिती समोर आलेली नाही. मात्र, पोलीस सध्या चौकशी करत आहेत.