इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः पुण्यातील रेल्वे स्टेशन परिसरात राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार रविवारी रात्री उशिरा घडला. सूरज शुक्ला नावाच्या तरुणाने हातात कोयता घेऊन गांधीजींच्या पुतळ्याचे शिर उडवण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत या व्यक्तीस ताब्यात घेतले असून, सखोल चौकशी सुरू आहे.
सदर व्यक्तीने पुणे रेल्वे स्थानकाजवळ उभारण्यात आलेल्या गांधीजींच्या पुतळ्यावर चढून तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. रात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याने परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत संभाव्य मोठा अनुचित प्रकार टाळला.
या घटनेमुळे संतप्त झालेल्या काँग्रेसने तातडीने निषेध नोंदवला आहे. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज (सोमवारी) सकाळी ११ वाजता पुणे रेल्वे स्टेशनजवळील गांधी पुतळ्यासमोर निषेध आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.