इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : पुणे आरटीओ प्रशासनाने नागरिकांना आणि कर्मचाऱ्यांना ‘हेल्मेट’ अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात दुचाकीने येणाऱ्या नागरिकांना आणि कर्मचाऱ्यांना आता ‘हेल्मेट’ परिधान करूनच यावे लागणार आहे. मागील महिन्यांत विभागीय आयुक्तांनी शहरातील सर्वच शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी ‘हेल्मेट’ सक्तीचा निर्णय घेतला होता.
त्यावेळी पुणे आरटीओ कार्यालयातील तीन ते चार कर्मचाऱ्यांना ‘हेल्मेट’ न परिधान केल्याने मेमो देण्यात आला होता. आता हा निर्णय कर्मचाऱ्यांसह नागरिकांनादेखील अनिवार्य करण्यात आला आहे. वाहन परवाना आणि इतर कामांसाठी आरटीओ कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त आहे.
रस्ता सुरक्षितता आणि वाहतुकीसाठी काम करणाऱ्या आरटीओ विभागाच्या कार्यालयातच येताना अनेकजण विना हेल्मेट येतात. त्यामुळे आरटीओ प्रशासनाने ‘हेल्मेट’ सक्तीचा निर्णय घेतला आहे. निवडणुकीच्या कामात सर्वच शासकीय यंत्रणा व्यस्त आहेत. त्यामुळे ‘हेल्मेट’ सक्तीची कार्यवाही कितपत प्रभावी होईल, हे सांगता येत नाही. निवडणुकीनंतर मात्र प्रभावीपणे काम केले जाईल, असे आरटीओ प्रशासनाचे म्हणणे आहे.