इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः पुण्यातील उच्चभ्रू कुटुंबात बालसंगोपनासाठी ठेवण्यात आलेल्या अल्पवयीन मुलीने दिल्लीत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदर तरुणी ही मूळ कर्नाटकातील असून काही महिन्यांपूर्वी आपल्या कुटुंबासह पुण्यात मोलमजुरीसाठी आली होती. पुण्याहून संबंधित कुटुंबासोबत ती दिल्लीत गेल्यानंतरच तिचा मृतदेह आढळून आला. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेली मुलगी वडगाव शेरी परिसरातील एका कुटुंबासोबत गेल्या दीड महिन्यांपासून राहत होती. ती त्या कुटुंबातील लहान मुलांचे संगोपन आणि देखभाल करण्याचे काम करीत होती. काही दिवसांपूर्वी हे कुटुंब कामानिमित्त दिल्लीत गेले असता त्यांनी अल्पवयीन मुलीलाही सोबत नेले होते. याची माहिती मुलीच्या पालकांनाही दिली गेली होती.
मात्र, २१ जून रोजी दिल्लीत असलेल्या घरात तिचा मृतदेह तळमजल्यावर असलेल्या खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. ही बाब समजताच संबंधित कुटुंबाने तातडीने स्थानिक पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यानंतर दिल्लीतून पुण्यातील चंदननगर पोलीस ठाण्यास माहिती देण्यात आली.
सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून, अल्पवयीन मुलीने आत्महत्या का केली? तिच्यावर कोणता मानसिक दबाव होता का? की इतर कोणती कारणं यामागे आहेत? याचा तपास दिल्ली पोलीस आणि पुणे पोलिसांकडून एकत्रितपणे केला जात आहे.