इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : शहरात गाड्यांच्या तोडफोडीच्या घटना वाढत चालल्या असून हा एक चिंतेचा विषय बनला आहे. नुकतीच फुरसुंगी पोलिस स्टेशनच्या हद्दीत अज्ञात टोळक्याने रात्रीच्या वेळी धुडगूस घालत अनेक वाहनांची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत सुमारे १० ते १२ वाहनांचे नुकसान झाले असून, यामध्ये दुचाकी, रिक्षा आणि खाजगी गाड्यांचा समावेश आहे.
या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात असून, लवकरच आरोपींना बेड्या ठोकल्या जातील.
दरम्यान, यापूर्वीही धनकवडी आणि सहकारनगर परिसरात अशाच तोडफोडीच्या घटना समोर आल्य होत्या, ज्यामध्ये पोलिसांनी काही आरोपींना अटक केली होती.
अशातच फुरसुंगीतील या ताज्या घटनेने पोलिसांसमोरील आव्हान वाढले आहे. स्थानिकांनी पोलिस गस्त वाढवण्याची आणि रात्रीच्या वेळी सुरक्षेची मागणी केली आहे. तर पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच संशयास्पद हालचालींची माहिती तात्काळ कळवण्यास सांगितले आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू असून, लवकरच आरोपींना पकडण्याचा दावा पोलिसांनी केला आहे.