इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात गणेशोत्सव सुरू होत आहे. पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीत गेल्या काही वर्षांपासून डोळे दिपवणाऱ्या प्रकाशझोतांचा (लेझर बीम) वापर करण्यात येत आहे. लेझर प्रकाशझोतांमुळे डोळ्यांना इजा पोहोचल्याची घटना गेल्या वर्षी घडली होती. या पार्श्वभूमीवर पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी विसर्जन मिरवणुकीत लेझर प्रकाशझोतांचा वापर करण्यास बंदी घातली आहे. कोणी लेझर बीम लाइट लावल्यास, कायदेशीर कारवाई करण्यात येईल,’ असा इशारा पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिला आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी पोलीस मुख्यालयात शहरातील सार्वजनिक मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर पोलीस आयुक्तालयात मंगळवारी मानाच्या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीनंतर पोलीस आयुक्तांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी शहराच्या मध्यभागात उत्सवाच्या काळात भाविकांची मोठी गर्दी होती. फरासखाना-विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाहतूक समस्या, वाहनांसाठी जागा (पार्किंग) याबाबत मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी सूचना केल्या आहेत. चोरीच्या घटना रोखणे, वाहतूक समस्या, तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांबाबत पोलिसांनी आतापासून तयारी सुरू केली आहे, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.