इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : पुणे विभागात लोणावळा ते दौंड दरम्यान रेल्वे मार्गाचे अपग्रेड करण्याचे नियोजन असून, पहिल्या टप्प्यात पुणे ते दौंड दरम्यान रेल्वे मार्गाचे अपग्रेडेशन केले आहे. त्यामुळे लिंक हॉफमेन बुश (एलएचबी) कोच असलेल्या ५५ रेल्वे गाड्या ताशी १३० किलोमीटर वेगाने धावत आहेत. या सर्व गाड्यांच्या वेळेत पाच मिनिटांपेक्षा जास्त बचत होत आहे. तसेच गोवा-एक्स्प्रेस, झेलम एक्स्प्रेस या गाड्यांचा समावेश आहे. या गाड्यांचा वेग वाढल्यामुळे पाच ते नऊ मिनिटांपर्यंत वेळेत बचत होत आहे.
पुणे विभागातील आणखी काही गाड्यांना एलएचबी कोच आल्यानंतर त्या गाड्यांचा वेग वाढविण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. मध्य विभागाचे मुख्य सुरक्षा आयुक्त (सीआरएस) यांनी पुणे ते दौंड दरम्यानच्या मार्गाची जून महिन्यात पाहणी केली. या मार्गावरून रेल्वे ताशी १३० किमी वेगाने धावण्यास सक्षम असल्याचे प्रमाणपत्र दिले होते. त्यानंतर रेल्वे प्रशासन रुळाच्या खालची बलास्ट (खडी), टॅम्पिंग सह अन्य कामे केली. ऑगस्ट अखेरपासून या मार्गावरून ताशी १३० किलोमीटर वेगाने रेल्वे गाड्या धावण्यास सुरुवात झाली.
पुणे रेल्वे विभागातील आणि येथून धावणाऱ्या एलएचबी कोच असलेल्या २२ गाड्या पहिल्या टप्प्यात १३० वेगाने धावण्यास सुरुवात केली. त्यात दररोज धावणाऱ्या आठ एक्स्प्रेस गाड्या होत्या. तर, १२ या साप्ताहिक गाड्या व दोन गाड्यांचा समावेश होता. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने जानेवारी २०२४ मध्ये एलएचबी कोच असलेल्या आणखी १९ गाड्यांचा वेग १३० पर्यंत वाढविला. तर, फेब्रुवारी २०२४ मध्ये पुन्हा ११ गाड्यांचा वेग वाढविण्यात आला. आता नव्याने काही दिवसांपूर्वीच गाड्यांना एलएचबी कोच मिळाले आहेत. त्यामुळे तीन गाड्या येत्या काही दिवसांमध्ये १३० किलोमीटरच्या वेगाने धावण्यास सुरुवात होणार आहेत.