इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः पुणे महापालिका निवडणुकांचा मार्ग अद्यापही सोपा दिसत नाहीये. गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या या बडलेल्या या निवडणुकांची प्रारूप प्रभाग रचना शुक्रवारी (22 ऑगस्ट) जाहीर होणार होती, मात्र निवडणूक आयोगाच्या तांत्रिक अडचणींमुळे हा मुहूर्त हुकला आहे. यामुळे निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या इच्छुकांचा हिरमोड झाला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेबाबत उपस्थित केलेल्या काही प्रश्नांची उत्तरे मिळणे अद्याप बाकी आहे. गुरुवारी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना तातडीने मुंबईत बोलावण्यात आले होते. दिवसभर झालेल्या सादरीकरणानंतरही केवळ अर्ध्याच प्रभाग रचनेवर चर्चा झाली आहे. यामुळे, आता प्रभाग रचना शनिवारीच जाहीर होण्याची शक्यता आहे.
महापालिकेच्या वतीने प्रभाग रचनेचे नकाशे प्रसिद्ध करण्याची तयारी पूर्ण झाली होती. आयोगाचा हिरवा कंदील मिळताच सकाळी 11 वाजेपर्यंत ती जाहीर करण्याचे नियोजन होते, पण ते शक्य झाले नाही.
बदललेले वेळापत्रक
नगरविकास विभागाने प्रभाग रचनेचे वेळापत्रक आधीच जाहीर केले होते, त्यानुसार 22 ते 28 ऑगस्ट दरम्यान ही रचना जाहीर करून त्यावर हरकती आणि सूचना मागवायच्या होत्या. आता त्यात बदल करण्यात आला असून, ही मुदत 22 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे. हरकती आणि सूचनांवर सुनावणीसाठी 5 ते 12 सप्टेंबर अशी नवीन मुदत देण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रक्रियेवरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांची जुगलबंदी सुरू आहे. 2017 मध्ये भाजप सत्तेत असताना त्यांनी प्रभाग रचनेत हस्तक्षेप केल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. आता राज्यात महायुतीची सत्ता असल्याने पुन्हा एकदा असाच आरोप महाविकास आघाडीकडून केला जात आहे. त्यामुळे, आता जाहीर होणारी प्रभाग रचना नेमकी कशी असेल आणि राजकीय पक्षांना ती कितपत मान्य असेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.