इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः नगर रस्त्यावरील वाघोली बस स्थानकात शनिवारी सायंकाळी पीएमपी बसच्या धडकेत एका महिला प्रवाशाला गंभीर दुखापत झाली. या प्रकरणी बस चालकाविरोधात वाघोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विजया दिलीप चव्हाण (वय ४६, रा. उंद्रे वस्ती, थेऊर रस्ता, केसनंद) असे जखमी महिलेचे नाव आहे. चव्हाण यांनी अपघातानंतर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (१२ जुलै) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास विजया चव्हाण वाघोली बस स्थानकात उभ्या होत्या. त्याच वेळी पीएमपी चालकाने बस अचानक वेगाने पाठीमागे घेतली. या दरम्यान बसने चव्हाण यांना धडक दिली. त्यामुळे त्यांच्या खांद्याचे हाड आणि बरगडी फॅक्चर झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अपघातानंतर चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून चालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाल्याचे स्पष्ट झाले आहे. वाघोली पोलिसांनी संबंधित चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस हवालदार घुले करीत आहेत.
शहरात अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या वर्षी ३३४ प्राणांतिक अपघातांमध्ये ३४५ जणांचा मृत्यू झाला. यंदा जूनअखेरीपर्यंत १४० जणांनी प्राण गमावले आहेत. त्यामुळे अपघातास कारणीभूत ठरलेल्या अवजड वाहनांचे परवाने रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. तसेच गेल्या पाच वर्षांतील अपघातग्रस्त वाहनांची माहिती संकलित करून ती वाहने जप्त केली जाणार आहेत.