इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाने (PMP) इलेक्ट्रिक बस पुरवणाऱ्या एका कंपनीला तब्बल 55 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. पीएमपीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांनी ही माहिती दिली असून, कंपनीने तातडीने बस दुरुस्ती न केल्यास त्यांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याचा इशाराही दिला आहे.
पीएमपीच्या ताफ्यात भाडेतत्त्वावर घेतलेल्या इलेक्ट्रिक बस वारंवार बंद पडत असल्याच्या तक्रारी येत होत्या. याची पाहणी केली असता, बसच्या बॅटऱ्या निकृष्ट दर्जाच्या असल्याचे समोर आले. या तपासणीत एकूण 45 ई-बस बंद असल्याचे आढळले, ज्यामुळे प्रवासी सेवेवर मोठा परिणाम होत होता.
या गंभीर बाबीची दखल घेत पीएमपी प्रशासनाने ‘ओलेक्ट्रा ग्रीनटेक लि.’ या ई-बस उत्पादन कंपनीला 55 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. पंकज देवरे यांनी सांगितले की, कंपनीला तातडीने निकृष्ट बॅटऱ्या बदलून तांत्रिक दुरुस्ती करण्याची सूचना देण्यात आली आहे. कंपनीने दंडाची रक्कम भरली असून दुरुस्तीचे कामही सुरू केले आहे, असे देवरे यांनी नमूद केले आहे.
मात्र, भविष्यात पुन्हा अशा प्रकारचा तांत्रिक बिघाड किंवा बस बंद पडल्यास कंपनीला काळ्या यादीत टाकून कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशाराही पीएमपी प्रशासनाने दिला आहे.