इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पिंपरी-चिंचवडः पिंपरी-चिंचवड शहरात १२ जनावरांना लम्पीचर्मरोगाची लागण झाल्याचे समोर आले आहे. हा विषाणूजन्य रोग असल्याने त्याचा प्रादुर्भाव वेगाने वाढण्याची भीती व्यक्त होत असून, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागासमोर या आजारावर नियंत्रण मिळवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. पुणे शहराच्या समाविष्ट गावांमध्ये आजही मोठ्या संख्येने पशुपालन केले जाते. हा रोग ‘कॅप्रीपॉक्स’ नावाच्या विषाणूमुळे होतो.
खबरदारी म्हणून बाधित जनावरांना निरोगी जनावरांपासून वेगळे ठेवावे. रोगाचा प्रादुर्भाव थांबण्यासाठी डास, माश्या, गोचीड यांसारख्या कीटकांचा बंदोबस्त करण्यासाठी पशुवैद्यकाच्या सल्ल्याने औषधांची फवारणी करून घ्यावी. पशुवैद्यकीय विभागाकडून असेही सूचित करण्यात आले आहे की, पशुवैद्यकाच्या मार्गदर्शनानुसार लसीकरण करून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण वेळेवर उपचार आणि योग्य काळजी घेतल्यास हा रोग निश्चितपणे बरा होऊ शकतो.
लम्पी आजार संक्रमक स्वरूपाचा असून, चावणाऱ्या माश्या, डास, गोचीड, चिलटे, बाधित जनावरांचा स्पर्श आणि दूषित चारा-पाणी यामुळे वेगाने पसरतो. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिका स्तरावर उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. पशु पालन करणाऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे की, चारा कमी खाणाऱ्या जनावरांना ताप आल्यास जवळच्या पशुवैद्यकीय विभागाशी संपर्क साधून उपचार सुरू करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.