इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पिंपरीः पिंपरी-चिंचवड शहरात पाण्याची चोरी रोखण्यासाठी महापालिकेने मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत शहरात २० हजार अनधिकृत नळजोड आढळून आले आहेत. सर्वाक्षणात शहरात एकूण ३० हजारांहून अधिक नळजोड अनधिकृत असल्याचा अंदाज आहे. महापालिकेने यासाठी ३२ कोटी रुपयांचा खर्च करून ठेकेदारामार्फत हे सर्वेक्षण सुरू केले आहे. ३० टक्के पाण्याची गळती आणि चोरी होत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
अनधिकृत नळजोडांची पडताळणी सुरू असून, त्यांना आवश्यक कागदपत्रे सादर करून जोडणी अधिकृत करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, झोपडपट्टी भागातील नवीन नळजोडांसाठी दंड न आकारता मीटरविरहित जोडणी देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
आतापर्यंत १,३४७ अनधिकृत नळजोड नियमित करून त्यांना पाणी मीटर बसवण्यात आले आहेत. या नळजोडधारकांकडून पाणीपट्टीची आकारणी देखील सुरू करण्यात आली आहे. शहरातील एकूण ७ लाख ३१ हजार नोंदणीकृत मालमत्तांच्या तुलनेत अधिकृत नळजोडांची संख्या कमी आहे
गेल्या सहा वर्षांपासून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा होत असून, या मोहिमेमुळे पाणीचोरीला आळा बसून पाणीपुरवठा अधिक प्रभावी होईल, अशी अपेक्षा आहे.