Saturday, August 2, 2025
Homeक्राईम न्यूजपक्ष्यांमुळे पुण्यातील विमानसेवा विस्कळीत; तात्पुरते उपाय अपुरे, प्रवाशांची सुरक्षा रामभरोसे

पक्ष्यांमुळे पुण्यातील विमानसेवा विस्कळीत; तात्पुरते उपाय अपुरे, प्रवाशांची सुरक्षा रामभरोसे

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणेः पुणे विमानतळावर पक्ष्यांच्या वाढलेल्या वावरामुळे विमान वाहतुकीच्या वेळापत्रकावर गंभीर परिणाम होत आहे. ही केवळ एक तात्पुरती अडचण नसून, आता ती एक मोठी चिंता बनली आहे, विशेषतः विमानांचे टेकऑफ आणि लँडिंग करताना पक्ष्यांचे थवे विमानाच्या मार्गात येत आहेत. ‘झोन गन’च्या आवाजाने पक्षी काही काळापुरते दूर जातात, परंतु काही मिनिटांतच ते पुन्हा परत येतात. यामुळे हे उपाय केवळ तात्पुरते ठरत असून, या समस्येवर दीर्घकालीन आणि प्रभावी उपायांची नितांत गरज आहे. नुकतेच, दिल्लीहून पुण्याला येणारे एक विमान धावपट्टीवर पक्ष्यांचा मोठा थवा असल्याने थेट सुरतला वळवावे लागले. यामुळे विमान कंपन्यांनाही मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. एका घटनेत तर पुण्यातील विमान वाहतूक तब्बल तीन तास ठप्प झाली होती.

पक्ष्यांचा हा वाढता वावर हा मानवी निष्काळजीपणाचे परिणाम आहे. विमानतळ परिसरात उरलेले अन्न, मांसाचे तुकडे आणि इतर कचरा टाकल्यामुळे पक्षी मोठ्या संख्येने आकर्षित होत आहेत. प्रशासनाने स्वच्छतेच्या बाबतीत अधिक कठोर नियम लागू करून त्यांची अंमलबजावणी करावी आणि नियम मोडणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करावी, अशी प्रवाशांची मागणी आहे.

या संदर्भात पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके यांनी सांगितले की, “पक्ष्यांच्या वावरामुळे कधीकधी विमान वाहतुकीत अडथळे येतात. मात्र, हवाई दलाच्या उपाययोजनांमुळे परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.” दरम्यान, या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढणे, पुणे विमानतळाच्या सुरक्षेसाठी आणि कार्यक्षमतेसाठी अत्यंत आवश्यक आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments