इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
सासवड २४ जूनः पुरंदर तालुक्यात मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावांमध्ये शेती, घरे, जनावरे आणि मालमत्तांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार विजय शिवतारे यांनी तहसीलदार विक्रम राजपूत यांना नुकसानीचे तातडीने पंचनामे करून मदतीसाठी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
कन्हा नदीच्या खोऱ्यात पावसामुळे ओढे आणि नाले खळखळून वाहत आहेत. काही भागांमध्ये घरांची पडझड झाली असून, जनावरांच्या गोठ्यांचेही नुकसान झाले आहे.
शिवतारे यांनी सांगितले की, गावोगावी जाऊन नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करा. तालुका कृषी अधिकारी सूरज जाधव यांना देखील शेतीच्या नुकसानीबाबत महसूल विभागाशी समन्वय साधण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
“शेतकऱ्यांना योग्य वेळी मदत मिळावी यासाठी प्रशासनाने तत्पर राहावे,” असे आवाहन शिवतारे यांनी केले आहे.