इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः नाना पेठेतील बालाजी कॉम्प्लेक्समध्ये पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या मानसिक त्रासाला कंटाळून ३९ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अतुल मारुती कदम (वय ३९, रा. पिंपरी चौक, नाना पेठ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात पत्नी आणि तिच्या मित्राविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पत्नी सोनाली अतुल कदम (वय ३१, रा. साडेसतरानळी, हडपसर) आणि तिचा मित्र कृष्णा शिंदे (रा. हडपसर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अतुल यांच्या आई माधुरी मारुती कदम (वय ६१) यांनी फिर्याद दिली आहे.
२०१५ मध्ये अतुल व सोनाली यांचा प्रेमविवाह झाला होता, मात्र काही वर्षांतच त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. दरम्यान, सोनालीचे कृष्णा शिंदे याच्याशी अनैतिक संबंध असल्याची माहिती अतुलला मिळाली होती. यावरून दोघांमध्ये सतत वाद होत होते. शेवटी सोनाली माहेरी निघून गेली होती.
फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, सोनाली आणि कृष्णा यांनी अतुलवर मानसिक दबाव आणायला सुरुवात केली होती. फोनद्वारे धमकी देणे, त्रास देणे असे प्रकार सुरू होते. या सततच्या छळामुळे नैराश्यात गेलेल्या अतुल यांनी १५ जून रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
आई माधुरी कदम यांनी दिलेल्या फिर्यादीत, पत्नी आणि तिच्या मित्राच्या त्रासामुळेच अतुलने जीवन संपवण्याचा निर्णय घेतल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक शेंडगे करीत आहेत.