इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
केडगाव : पर्यावरणाचे संतुलन ठेवण्यासाठी आणि पर्यावरणाला प्रदूषणापासून वाचण्यासाठी झाडे महत्त्वाची भूमिका बजावतात. कारण, वृक्ष आपल्यासाठी खूप मदत करतात. वृक्ष आपल्याकडून कुठल्याही गोष्टीचे अपेक्षा न ठेवता त्यांच्यापासून मिळणाऱ्या सर्व गोष्टी मनुष्याला विनामुल्य प्रदान करतात. झाडे म्हणजे निसर्गाने मानवाला दिलेला एक वरदान आहे. कोरोना काळात आपल्या सर्वांना ऑक्सिजनचे महत्त्व समजले आहे. त्यामुळे आपण सर्वांनी वृक्षारोपण केले पाहिजे, असे प्रतिपादन तहसिलदार अरूण शेलार यांनी केले आहे.
आज रविवार (दि. 11 ऑगस्ट) रोजी देलवडी तालुका दौंड येथे 600 देशी झाडांचा विस्तारित आईचे बन (फेज 2) प्रकल्पाचे उद्घाटन प्रसंगी देलवडी परिसरात तब्बल 5 ते 6 एकर क्षेत्रावर वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना वरील प्रतिपादन तहसिलदार अरूण शेलार यांनी केले.
कोविड कालावधीत म्हणजेच 3 वर्षापूर्वी गावातील तरुणाई एकत्र आली. उच्चशिक्षित युवकाबरोबर एक मित्र वृक्ष संघटनेच्या मार्गदर्शनातून उजाड माळरानावर 600 झाडे लावण्यात आली. अवघ्या 1 महिन्यामध्ये 4 लाख रूपये लोकवर्गणी गोळा करण्यात आली. गावातील प्रत्येक कुटंबातील व्यक्तीने आपल्या आईच्या नावे प्रेमाखातर प्रत्येकी एक झाड दिले म्हणून या प्रकल्पाला आईचे बन असे नाव देण्यात आले. आता 3 वर्षानंतर आईच्या बनाच्या पुढच्या टप्यातील वृक्षारोपणासाठी 3 लाख रुपये लोकवर्गणी गोळा करण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी 1990 सालापासून पुढील काळात देलवडीत असलेल्या सर्व शिक्षकांना आमंत्रित केले होते, कारण त्याच्याबद्दल प्रेम व्यक्त करण्यासाठी हा दुसरा टप्पा होता. यातील प्रत्येक शिक्षकांचा आपल्या गावातील मुलांच्या विकासात वाटा आहे. गावाला समर्पित असा 600 फळ झाडांचा प्रकल्प व त्यामध्यें आपल्या गुरुजणांच्या हस्ते लागवड करण्यात आली. सर्वांसाठी हा मोठा बहुमान होता. शिक्षकांचा या कार्यक्रमाच्या निमित्ताने देलवडी गावाच्या वतीने यथोचित सत्कारही करण्यात आला.
आपल्या संपूर्ण अस्तित्वात झाडांनी आपले जीवन टिकवून ठेवण्यास मदत केली आहे. त्यांच्याकडे व्यावहारिक आणि व्यावसायिक उपयोगांची विस्तृत श्रेणी आहे. त्यामुळे झाडे आपल्यासाठी खूप काही करत असतील तर त्यांच्या संगोपनाची काळजी घेणे आणि त्यांना योग्य सूर्यप्रकाश, पाणी आणि सावली देणे हे आपले काम आहे. तसेच निसर्गाचा समतोल राखण्यासाठी सर्वांनी झाडे लावली पाहिजेत. तसेच पुढील काळात देखील असे कार्यक्रम घेतल्याने सर्वांना एकत्र येण्याची संधी मिळेल असे प्रतिपादन भिमा पाटस चे संचालक विकास शेलार यांनी केले.
या बनामध्ये प्रकाश शेलार, राजेंद्र बंड, दत्तात्रय शेलार, सचिन शेलार, प्रकाश जाधव, मंगेश भालेराव यांच्या वतीने सर्व देखभाल केली जाते. ग्रामस्थ अनिल शेलार यांच्या वतीने बनासाठी मोफत पाणी उपलब्ध करून दिले आहे. या कार्यक्रम प्रसंगी तहसिलदार अरूण शेलार, संचालक विकास शेलार, सभापती शिवाजी वाघोले, सरपंच निलम काटे, सर्व अध्यापक वर्ग, संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.