इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
सोलापूरः शहरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. लष्कर भागातील एका कुटुंबातील पाच जण अचानक बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यांच्या तोंडाला फेस आलेला दिसून आल्यानंतर त्यांना तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान दोन चिमुकल्या भावंडांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तिघांवर उपचार सुरू आहेत.
मृतांमध्ये हर्ष बलरामवाले (वय 6) व अक्षरा बलरामवाले (वय 4) या दोन चिमुकल्यांचा समावेश आहे. तर युवराज मोहनसिंग बलरामवाले (वय 40), रंजना युवराज बलरामवाले (वय 35) आणि विमल मोहनर्सिंग बलरामवाले (वय 60) यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, झोपताना गॅस नीट बंद न झाल्यामुळे छोट्याशा खोलीत वायू पसरून सर्वजण बेशुद्ध झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ही घटना रविवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास उघडकीस आली. यावेळी घरात गेलेल्या शेजारील महिलेने संपूर्ण कुटुंब बेशुद्ध अवस्थेत पाहून नागरिकांच्या मदतीने त्यांना रुग्णालयात दाखल केले.
या प्रकरणी कुटुंबातील सदस्यांचे रक्त नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. बलरामवाले कुटुंब दोन दिवसांपूर्वीच तिरुपती दर्शन करून परतले होते. मात्र या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.