इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
आळेफाटा : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आळेखिंड येथेनाकाबंदीदरम्यान आळेफाटा पोलिस व कर्मचारी यांनी दुग्धजन्य व इतर पदार्थांची वाहतूक करणाऱ्या शीतकरण वाहनातून आलेला २३ किलो गांजा पकडला आहे. या कारवाईत दोन जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ६ लाख रुपये किमतीचा गांजा व ४५ लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकूण ५१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. २९) पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास केली आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक दिनेश तायडे यांनी दिली आहे.
सुदर्शन गोविंद डोंगरे (वय २४, रा. काळवाडी, ता. जुन्नर) व देवसुंदर अमलेश मैथी (वय ४८, रा. पूर्व मेदनापूर, पश्चिम बंगाल) अशी अटक करण्यात आलेल्या चालकांची नावे आहेत. याबाबत पोलिस हवालदार दीपक नागरे यांनी आळेफाटा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओडिसा येथून शीतकरण वाहनातून गांजा विक्रीस येणार असल्याची माहिती आळेफाटा पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक विनोद दुर्वे व पोलिस जवान शैलेश वाघमारे यांनी याचा वेळोवेळी मागोवा घेतला. मंगळवारी (दि. २९) पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास आळेखिंड तपासणी नाक्यावर दुग्धजन्य व इतर पदार्थांची वाहतूक करणारा टँकर (एमएच १४ जीयू ८०८८) आला असता पोलिसांनी टँकर थांबवून त्याची तपासणी केली असता २३ किलो ७०० ग्रॅम गांजा आढळून आला.
यानंतर पोलिसांनी हा ट्रक व गांजा आळेफाटा पोलिस ठाण्यात आणला. सुदर्शन डोंगरे व देवसुंदर मैथी या चालकांची चौकशी केली असता त्यांनी ओडिसा येथून जुन्नर, आंबेगाव व खेड तालुक्यात हा गांजा विक्रीस आणल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीना अटक करून ६ लाख रुपयांचा गांजा व ४५ लाख रुपये किंमतीचे वाहन असे एकूण ५१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कामगिरी जिल्हा पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र चौधर यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दिनेश तायडे, पोलिस उपनिरीक्षक विनोद दुर्वे, सहायक पोलिस उपनिरीक्षक चंद्रशेखर डुंबरे, पोलिस हवालदार विनोद गायकवाड, भीमा लोंढे, पोपट कोकाटे, पोलिस जवान शैलेश वाघमारे, दीपक नागरे, भुजंग सुकाळे, अमित माळुंजे, सचिन कोबल यांच्या पथकाने केली.