इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : पुण्यातील खराडी येथे एका अलिशान फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी टाकलेल्या धाडीत माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना रंगेहाथ अटक करण्यात आले. या प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ माजली असून, अनेक नेते यावर प्रतिक्रिया देत आहेत. याचदरम्यान, आता एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेत यावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी ते म्हणाले, ‘मला या प्रकरणाबद्दलची जास्त माहिती नाही. सध्याच्या वातावरणामुळे असं काही घडेल, असं मला वाटतंच होतं. मी केल्या आरोपांमुळे अडवलं जातंय, याची शक्यता नाकारता येत नाही. सत्य बाहेर आलंच पाहिजे, मग तो जावई असो वा कुणी असो. पण त्याची सत्यता समोर आल्याशिवाय समजणार नाही. मी स्पष्ट मताचा माणूस आहे. मी कुणाला वाचणारा माणूस नाही. गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे पण जर शडयंत्र असेल तर ते उघडकीस आलं पाहिजे, असं एकनाथ खडसे म्हणाले.
शनिवारी रात्री खराडी परिसरात एका फ्लॅटमध्ये ‘हाऊस पार्टी’च्या नावाखाली सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी अचानक धाड टाकली. या कारवाईत प्रांजल खेवलकरसह तीन महिला आणि चार जणांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणात खडसेंच्या जावयाचे नाव समोर आल्याने राजकारणात एकच गोंधळ निर्माण झाला. या पार्टीत पोलिसांना अमली पदार्थ, मद्य आणि हुक्के सापडले असून, पुढील कारवाई सुरु आहे.