Saturday, August 30, 2025
Homeक्राईम न्यूजतळेगाव-शिक्रापूर परिसरात खासगी सावकारांचा उच्छाद; शेतकरी व व्यावसायिकांची पिळवणूक

तळेगाव-शिक्रापूर परिसरात खासगी सावकारांचा उच्छाद; शेतकरी व व्यावसायिकांची पिळवणूक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

टाकळी भीमा : तळेगाव ढमढेरे आणि शिक्रापूर परिसरातखासगी सावकारांचा उच्छाद गेल्या काही महिन्यांत प्रचंड वाढला असून शेतकरी, छोटे व्यावसायिक आणि मजूरवर्ग सावकारांच्या जाळ्यात अडकला आहे. मासिक 10 ते 12 टक्के, तर काही वेळा 15 टक्क्यांपर्यंत व्याज आकारून या सावकारांनी नागरिकांची अक्षरशः पिळवणूक सुरू केली आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, परिसरात बँका आणि पतसंस्था असूनही गरीब आणि सर्वसामान्यांना आवश्यक कर्ज मिळवण्यासाठी लागणारी कागदपत्रे व प्रक्रिया पूर्ण करणे अवघड जाते. हीच संधी साधून काही लोकांनी खासगी सावकारीचा व्यवसाय सुरू केला आहे. त्यामुळे भाजीविक्रेते, छोटे दुकानदार, शेतकरी आणि मजूरवर्ग सावकारांच्या कचाट्यात अडकले आहेत.

एकदा का कर्जदार सावकारांच्या जाळ्यात अडकला की त्याची सुटका होणे जवळपास अशक्य होते. मिळालेला सगळा नफा व्याजफेडीत खर्च झाल्याने अनेक व्यापारी मेटाकुटीला आले आहेत. “व्यवसाय आपल्यासाठी करायचा की सावकारांसाठी?” अशी परिस्थिती अनेकांवर ओढवली आहे.

सावकार मंडळी गरजेनुसार मनमानी व्याजदर लावतात. वसुलीसाठी दमबाजी, मारहाण यांसारखे प्रकार घडत असल्याचे सांगितले जाते. संघटित पद्धतीने काम करणारे हे सावकार एकमेकांना मदत करून पैशांची वसूली करतात.

मजुरांच्या हाताला पावसाळ्यात काम नसल्याने ते दैनंदिन खर्च भागवण्यासाठी सावकारांकडे वळतात. मात्र त्यातून सुटण्याऐवजी ते कर्जाच्या अधिक मोठ्या खाईत अडकतात. या परिस्थितीमुळे परिसरात तीव्र नाराजी पसरली असून खासगी सावकारकीला आळा घालावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments