इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः पुणे मेट्रोच्या टप्पा 1 अंतर्गत छत्रपती संभाजी उद्यान मेट्रो स्थानक ते शनिवार पेठ यांना जोडणाऱ्या पादचारी पुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी संपन्न झाले.
या प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “हा पादचारी पूल केवळ एक भौगोलिक दुवा नाही, तर पेठ भागातील नागरिकांसाठी मेट्रोच्या वापराची सोय वाढवणारा एक महत्त्वाचा टप्पा आहे. स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या पुलामुळे पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला चालना मिळणार आहे.”
डेक्कन जिमखाना आणि छत्रपती संभाजी उद्यान मेट्रो स्थानकांना पेठ भागाशी जोडण्यासाठी नियोजित असलेल्या दोन पुलांपैकी शनिवार पेठला जोडणाऱ्या पादचारी पुलाचे बांधकाम पूर्ण झाले असून, तो नागरिकांच्या सेवेत दाखल झाला आहे.
हा पूल विशेषतः मुठा नदीच्या काठावर वसलेल्या शनिवार पेठ, नारायण पेठ व इतर परिसरातील नागरिकांना मेट्रो स्थानकापर्यंत सहज पोहोचण्याची सुविधा पुरवणार आहे.
या नव्या पुलामुळे मेट्रोचा उपयोग अधिक सुलभ होत असून, शहरातील वाहतूक व्यवस्थेवर सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच हा पूल अभियांत्रिकी कौशल्य आणि सांस्कृतिक जाण यांचा उत्कृष्ट संगम असल्याचे दिसून येत आहे.
या उद्घाटन सोहळ्यास केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोहे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार हेमंत रासने, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे तसेच महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर उपस्थित होते.