इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे, ता. 17 : मोबाईल फोन वरून पैसे पाठविताना एक क्रमांकचुकल्याने दुसऱ्याच्या खात्यावर 75 हजार रुपये गेल्याची घटना घडली आहे. ही घटना भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून शुक्रवारी (ता.16) सकाळी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. मात्र भारती विद्यापीठ पोलिसांनी त्वरित कर्त्यव्यनिष्ठा दाखविल्याने त्या व्यक्तीला अवघ्या 10 मिनिटात पैसे परत मिळाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या वडिलांकडून घाईगडबडीत आंध्रप्रदेश येथील इसमाच्या नंबरवर चुकीने पैसे पाठविले होते. मात्र सदरचा इसम हा त्यांचे पैसे परत करण्यास टाळाटाळ करीत आहे. अशी तक्रार भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दिली होती. या घटनेची वरीष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगांवकर यांनी तात्काळ दखल घेतली. त्यानंतर पोलीस अंमलदार राहुल बांडे व दिपक शेंडे यांना सदर इसमास त्याची रक्कम परत मिळवुन देण्यासाठी मार्गदर्शन करुन सुचना दिल्या.
त्यानुसार पोलीस अंमलदार राहुल बांडे व दिपक शेंडे यांनी तात्काळ आंध्रप्रदेश येथील इसमाशी संपर्क केला. त्यास पोलीस असल्याची व्हाट्सअप व्हिडिओ कॉलद्वारे खात्री करुन दिली. आणि त्याच्याकडून अवघ्या दहा मिनिटांमध्ये 75 हजार रुपये तक्रारदार यांना परत मिळवून दिले. ही कामगिरी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगांवकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राहुलकुमार खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार राहुल बांडे व दिपक शेंडे यांनी केली आहे.