इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पिंपरी : चिंचवडमध्ये आधी महायुतीकडून शंकर जगताप यांना तर महाविकास आघाडीकडून राहुल कलाटे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर शरद पावारांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न केल्यानंतरही नाना काटे यांना डावलण्यात आलं. त्यानंतर मात्र, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक नाना काटे यांनी अखेर अपक्ष लढण्याचे जाहीर केले आहे.
मी लढणार, असं म्हणत बंडखोरी करण्यावर नाना काटे ठाम आहेत. सोमवारी २८ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे काटे यांनी सांगितले आहे. त्यामुळे महायुतीकडून लढत असलेले भाजपचे उमेदवार शंकर जगताप यांच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे.
चिंचवड विधानसभा मतदारसंघाची जागा अजितपवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाने घ्यावी, अशी माजी नगरसेवकांची मागणी होती. मात्र, ज्या पक्षाचा आमदार, त्या पक्षाला जागा या महायुतीच्या सूत्रानुसार चिंचवडची जागा भाजपकडे गेली. भाजपने विद्यमान आमदार अश्विनी जगताप यांच्याऐवजी त्यांचे दीर भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांना उमेदवारी दिली.
त्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवारी मिळविण्याचा प्रयत्न नाना काटे यांनी केला. शरद पवार, जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांची भेट देखील नाना काटे यांनी घेतली. मात्र, या पक्षाने राहुल कलाटे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाना काटे यांनी अपक्ष लढण्याचे आज जाहीर केले.
काय म्हणाले नाना काटे?
निवडणूक लढविण्याच्या भूमिकेवर मी ठाम आहे. नागरिक माझ्यासोबत आहेत. पोटनिवडणुकीमध्ये मला एक लाख मते पडली होती. नागरिकांच्या विश्वासावर मी पुन्हा निवडणुकीला सामोरे जाणार असून राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी माझ्यासोबत राहतील. राष्ट्रवादीचे प्रमुख अजित पवार यांनी मला तयारी करण्यास सांगितले होते. मात्र, मतदारसंघ भाजपला सुटला. त्यानंतर शरद पवार यांच्या पक्षातील नेत्यांशी चर्चा केली होती. त्यांनी त्यांची भूमिका पार पाडली. आम्ही उमेदवारी अर्ज दाखल करून आमची भूमिका स्पष्ट करू, असे नाना काटे यांनी यावेळी सांगितले.