इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
बार्शीः बार्शी तालुक्यातील सासुरे गावात मंगळवारी गोविंद बर्गे यांचा मृतदेह आढळून आला होता. दरम्यान, आता गोविंद बर्गे मृत्यूप्रकरणाने एक वेगळेच वळण घेतले आहे. 34 वर्षीय गोविंद जगन्नाथ बर्गे (रा. लुखामसला, जि. बीड) यांच्या नातेवाईकांनी या घटनेत घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.
गोविंद यांच्या कारचा दरवाजा आतून लॉक होता आणि गाडीची बॅटरीही उतरली होती. नातेवाईकांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे की, जर ही आत्महत्या असेल, तर बॅटरी कशी उतरू शकते? पोलिसांना यात काहीतरी संशयास्पद वाटत असल्याने, या प्रकरणात अधिक सखोल तपास सुरू झाला आहे.
आत्महत्या की घातपात ?
गोविंद बर्गे यांचे 21 वर्षाच्या पूजा गायकवाड या नर्तकीसोबत प्रेमसंबंध होते. पूजाला पोलिसांनी अटक केली असून, तिला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोविंदने जेव्हा गोळी झाडली, तेव्हा पूजा सासुरे गावात नव्हती. ती रात्रभर पारगाव येथील एका कला केंद्रात होती.
गोविंद बर्गे पूजाला शोधत गेवराईहून बार्शीला आले होते, कारण तिचा फोन लागत नव्हता. त्यामुळे, पोलिसांनी आता गोविंद आणि पूजा यांच्यातील फोन कॉल रेकॉर्ड तपासण्याचा निर्णय घेतला आहे. हा तपास आत्महत्येमागचे नेमके कारण आणि घटनाक्रम स्पष्ट करू शकेल. चौकशीतून या प्रकरणाचा गुंता सुटून सत्य लवकरच समोर येईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.