इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : पुणे बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या दुर्लक्षामुळे बाजारात चुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. मार्केटयार्डच्या मुख्य प्रवेशद्वारावर वाहनचालकांकडून गणेशोत्सव मंडळाच्या नावाखाली रविवारी सक्तीने वर्गणी गोळा केली गेली. मंडळाचे स्टिकर १०० रुपयांना विक्री करण्यासाठी काही जण टोळक्याने वाहने अडवीत होते. हा प्रकार बाजार समितीच्या विभागप्रमुख आणि काही अधिकाऱ्यांसमोर सुरू असतानाही त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. स्वतः कोट्यधीश असलेल्यांनीच रस्त्यावर उतरून गोरगरीब वाहनचालकांकडून वसुली केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याबाबत एक टेम्पो चालक म्हणाला की, इंधन दरवाढीसह महागाई वाढली आहे. बाजारात टेम्पोंची संख्या वाढल्याने व्यवसाय कमी झाला आहे. त्यात १०० रुपये देणे शक्य नसते. १०० रुपये नाही म्हटलो, तर वर्गणी गोळा करणारे उद्यापासून टेम्पोच सोडत नाही, अशी धमकी देतात. यामुळे नाईलाजास्तव पैसे द्यावे लागतात.
मंडळाचे वार्षिक उत्पन्न कोट्यवधींचे
बाजार समितीने मंडळाला कायमस्वरूपी उत्पन्न मिळावे, यासाठी ४ गाळे, २ हॉटेल दिली आहेत. बाजारातील ५५ मोकळ्या जागांचे नियमबाह्यरीत्या भाडे देखील मंडळाला मिळत असल्याची चर्चा आहे. याबाबत कुठेही लेखी पावती अथवा नोंद नाही. यातून निव्वळ भाड्याचे उत्पन्न दीड ते पावणेदोन कोटीच्या घरात असल्याचे सांगितले जाते. तर, काही वर्षापूर्वी दिवंगत अडते असोसिएशनचे माजी संचालक शेखरबापू कुंजीर हे मंडळाचे अध्यक्ष असताना उत्सवासाठी वर्गणी मागायला लागू नये म्हणून प्रत्येक आडत्यांकडून १० हजार रुपये आकारले होते. बाजारात १ हजार गाळे आहेत. या वर्गणीची ठेव ठेवून व्याजावर उत्सव साजरा करण्याचे ठरले होते. तरीही अद्यापही वर्गणी घेतली जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.