इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीचं आमिष दाखवत, बनावट ई-मेल आयडींचा वापर करून तब्बल ४ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार बाणेर परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी बाणेरमध्ये राहणाऱ्या सूदर्शन श्रीकांत लाठकर (वय ३३) यांनी बावधन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी आंध्र प्रदेशातील तिरूमलशेट्टी व्यंकटेश्वर राव उर्फ टी. व्ही. राव आणि तिरूमलशेट्टी राघव यांच्यासह इतरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही फसवणूक १ जानेवारी २०२३ ते ३१ जुलै २०२४ या कालावधीत घडली. आरोपींनी आपसांत संगनमत करून ICICI सिक्युरिटीज या नामांकित संस्थेच्या नावाने service@icicidirect.online, inspection@icicidirect .online, adjudication@icicidirect.online हे बनावट ई-मेल आयडी तयार केले. या ई-मेलवरून बनावट कॉन्ट्रॅक्ट नोट पाठवून टाटा मोटर्स शेअर्सच्या खरेदी-विक्री केल्याचे भासवून सुरुवातीला काही प्रमाणात परतावा दिला. त्यानंतर फिर्यादी लाठकर यांच्याकडून टप्प्याटप्प्याने सुमारे ४ कोटी ९७ लाख रुपये घेतले. त्यापैकी ९९ लाखांचा परतावा करून उर्वरित ३.९८ कोटी रुपये परत न करता स्वतःच्या फायद्यासाठी वापरून त्यांची आर्थिक फसवणूक केली.