इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पळसदेव : केवळ शासकीय विभागांमध्येच नव्हे तर विविध महामंडळे, जिल्हा परिषद, प्रकल्प वाणिज्य विभाग, स्थानिक निधी लेखापरीक्षण कार्यालय आदि ठिकाणी वित्त लेखा विषयकच्या जबाबदारीची कामे राज्य व वित्त लेखा संवर्गातील अधिकारी सक्षमपणे सांभाळत असतात.
प्रशासनाच्या कामकाजात एकसुत्रीपणा व गतिमानता आणण्यासाठी वित्त व लेखा संवर्गाने नेहमीच सहकार्याची भूमिका बजावलेली आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य वित्त व लेखा सेवा गट ब राजपत्रित अधिकारी संघटनेचे उपाध्यक्ष व माध्यमिक शिक्षण विभाग पुणे वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाचे सहाय्यक लेखाधिकारी शिवाजी खराडे यांनी केले.
राज्य वित्त व लेखा सेवा गट ब राजपत्रित अधिकारी संघटनेची शनिवार (दि. २४) पुणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. खराडे म्हणाले की, वित्त व लेखा संवर्गातील अधिकाऱ्यांच्या विविध समस्या, जुन्या पेन्शनसारखा जिव्हाळ्याचा प्रश्न, प्रलंबित मागण्या प्रश्न यांना शासन दरबारी न्याय मिळवून देण्यासाठी वित्त व लेखा राजपत्रित अधिकारी संघटना नेहमीच अग्रेसर असते.
यावेळी सभेत राज्य वित्त व लेखा सेवा गट ब राजपत्रित संघटनेचे अध्यक्ष दीपक धनगर म्हणाले की, सहाय्यक लेखाधिकारी वर्गाची भूमिका महत्वाची असून विविध शासकीय खात्यातील जमा रक्कमेचे योग्य पदधतीने लेखांकन ठेवणे, शासकीय तिजोरीतून होणाऱ्या खर्चावर नियंत्रण ठेवणे आदि जबाबदाऱ्या वित्त व लेखा संवर्ग चोखपणे पार पाडत आहेत. संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेवेळी राज्य समन्वयकपदी निलेश बोंगिरवार यांची निवड करण्यात आली.
याप्रसंगी संघटनेचे योगेश दांदळे, राहुल गांगर्डे, रक्षा मस्कर, संजय ठेणगे, ज्ञानोबा पतंगे, विनायक राऊत, पुणे विभागीय अध्यक्ष प्रशांत चव्हाण आदींसह राज्यभरातील सहाय्यक लेखाधिकारी व संघटनेचे जिल्हा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजाता भिडे व मनीषा कुंभार यांनी केले. तर आभार प्रदर्शन पुणे जिल्हाध्यक्षा सीमा सातपुते यांनी मानले.