इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : लाडक्या गणरायाचे आगमन यंदा 7 सप्टेंबर रोजी होणार आहे. बाप्पाचे सर्वत्र जल्लोषात आगमन होणार आहे. पुण्यातील गणेशोत्सव अनुभवण्यासाठी देश-विदेशातील भाविक पुण्यात दाखल होतात. दरम्यान, या दिवसात शहरात मध्यभागात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी 5 ते 18 सप्टेंबर दरम्यान, शहराच्या वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे. गणेशोत्सवाच्या दिवसात पुणे शहरात मध्य भागात अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. या वाहतूक बदलांची काटेकोर पद्धतीने पालन करण्यात यावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.
गणरायाच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने पुण्याच्या रस्त्यावर येतात. यामुळे होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता पूर्व तयारी म्हणून वाहतूक शाखेने कंबर कसली आहे. त्यानुसार, शहरातील मध्यभागातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी 5 ते 18 सप्टेंबर या दिवसांमध्ये सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.
पुण्यात व्यापारी पेठेत अवजड वाहनांनी माल पोहचवला जातो. मात्र, गणेशोत्सादरम्यान या अवजड वाहनांमुळे होणारी संभव्य वाहतूक कोंडी लक्षात घेता शहरात अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. त्यानंतर छोट्या वाहनातून त्यांनी साहित्य मध्यभागात आणावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे. तसेच जड वाहन चालकांनी मध्यभागात वाहने आणू नयेत व वाहतूककोंडी टाळण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन देखील वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.
या भागात राहणार जड वाहनांना बंदी…
शास्त्री रस्ता – सेनादत्त चौकी ते अलका चित्रपटगृह, टिळक रस्ता- जेधे चौक ते अलका चित्रपटगृह चौक, कुमठेकर रस्ता – शनिपार ते अलका चित्रपटगृह चौक, लक्ष्मी रस्ता संत कबीर चौक ते अलका चित्रपटगृह चौक, केळकर रस्ता- फुटका बुरूज ते अलका चित्रपटगृह चौक, बाजीराव रस्ता- पूरम चौक ते गाडगीळ पुतळा चौक, छत्रपती शिवाजी रस्ता- गाडगीळ पुतळा ते जेधे चौक, कर्वे रस्ता- नळस्टॉप ते खंडोजीबाबा चौक, फर्ग्युसन रस्ता खंडोजीबाबा चौक ते वीर चापेकर चौक, सिंहगड रस्ता- राजाराम पूल ते स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, मुदलीयार रस्ता, गणेश रस्ता, पॉवर हाऊस चौक ते दारूवाला पूल ते जिजामाता चौक ते फुटका बुरूज चौक या भागात राहणार जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.