इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेशी संबंधित एक बातमी समोर आली आहे. आज पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून मारणे टोळीच्या १० ते १२ गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने गजा मारणे याच्यासह त्याच्या टोळीतील इतर सदस्यांच्या गाड्या जप्त केल्या आहेत. जप्त केलेल्या गाड्यांमध्ये २ टोयोटा फॉर्च्यूनर, १ महिंद्रा थार, १ टाटा नेक्सन यासह आणखी ४ चारचाकी गाड्या जप्त केल्या आहेत. चारचाकी गाड्या बरोबरच गुन्हे शाखेने दुचाकीसुद्धा जप्त केल्या आहेत.
नेमकं प्रकरण काय ?
पुण्यातील कोथरूडमध्ये काही दिवसांपूर्वी खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या निकटवर्तीयाला मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर गजा मारणेवर मोक्का लावण्यात आला असून त्याला सुरुवातीला येरवडा कारागृहात ठेवण्यात आलं. त्यानंतर त्याला सांगलीला रवाना करण्यात आले. गजा मारणेला पुण्याहून सांगलीला घेऊन जात असताना कणसे ढाब्यावर पोलिसांची मटण पार्टी झाली होती. याची माहिती पुणे पोलीस आयुक्त नितेश कुमार यांना लागली असता त्यांनी याप्रकरणी चार पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन केले होते. ढाब्यावर जेवण करत असताना गजा मारणे याला भेटायला आलेल्या ३ जणांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, आता गजा मारणे टोळीला पुणे पोलिसांकडून आणखी एक दणका देण्यात आला आहे. पोलिसांनी मारणेच्या दुचाकीसह १० ते १२ आलिशान चारचाकी गाड्या जप्त केल्या आहेत.