इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
खेड-शिवापूर, ता. 14: पुणे-सातारा रस्त्यावरील खेड-शिवापूरपरीसरातील सेवा रस्त्याचे कॉन्क्रीटीकरण सोडा निदान या रस्त्यावरील खड्डे तरी बुजवा, अशी मागणी स्थानिक नागरीक करत आहेत.
पुणे-सातारा रस्त्यावरील खेड-शिवापूर ते वेळू फाट्यावरील सातारा ते पुण्याकडील सेवा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी रस्त्याची खडी उखडली आहे. ड्रेनेज फुटल्याने रस्त्यावरुन पाणी वाहून दुर्गंधी पसरली आहे. या सर्व प्रकारामुळे या सेवा रस्त्यावर अनेक अपघात घडत आहेत. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचून डबकी तयार होत आहेत. त्यातून वाहन चालविताना वाहन चालकांची तारांबळ होत आहे.
सुमारे एक वर्षापासून या सेवा रस्त्याची दुरावस्था झाली आहे. त्यातच खेड शिवापूर परीसरातील सेवा रस्त्याचे कॉन्क्रीटीकरण करण्यात येणार असून मार्च 2025 मध्ये ते काम सुरु होणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सांगण्यात आले होते. मात्र आता मार्च उलटून दोन महीने झाले. तरीही या रस्त्याचे कॉन्क्रीटीकरण सुरु झाले नाही.
त्यामुळे स्थानिक नागरीक वैतागले आहेत. रस्त्याचे कॉन्क्रीटीकरण सोडा निदान हा रस्ता अगोदर दुरुस्त तरी करा, अशी मागणी स्थानिक नागरीक करत आहेत. याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.