इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणात ‘पोर्शे’ कारमध्ये मागे बसलेल्या अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर अखेर आरोपी अरुणकुमार सिंग बुधवारी (दि. ६) पुणे जिल्हा सत्र न्यायालयात शरण आला. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी (ता. ५) सिंग याचा जामीन फेटाळला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी तो हजर झाला आहे. अरुणकुमार देवनाथ सिंग असे आरोपीचे नाव आहे.
कारचालक मुलाच्या दोन अल्पवयीन मित्रांना वाचविण्यासाठी या गुन्ह्यात यापूर्वी अटक करण्यात आलेले आरोपी यांनी ससूनच्या आपत्कालीन विभागाचा तत्कालीन मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर व न्यायवैद्यक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे यांना लाच दिली. त्यानंतर एका आरोपीने एका मुलाच्या रक्ताच्या नमुन्यांच्या जागी स्वतःच्या रक्ताचा नमुना दिला, तर आशिष नावाच्या आरोपीने अरुणकुमार सिंग याच्या सांगण्यावरून दुसऱ्या मुलाच्या जागी स्वतःचे रक्त दिल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले होते.
या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर सिंग याने येथील जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने तो फेटाळला होता. त्यामुळे त्याने उच्च न्यायालयात अपील केले होते. सुरुवातीला त्याला अंतरिम जामीन मंजूर केला होता. मात्र, आता न्यायालयाने त्याचा जामीन २३ ऑक्टोबरला फेटाळून लावला होता.
उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाविरोधात सिंग याने सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. सर्वोच्च न्यायालयाने सिंग याला कोणत्याही प्रकारचा दिलासा न देता रक्त बदलण्याच्या प्रक्रियेत सक्रिय सहभाग दिसत असल्याने जामीन फेटाळून लावला. सिंग याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.