इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः शहरातील उच्चभ्रू परिसरात असलेल्या वेस्टीन हॉटेलसमोर रविवारी (२२ जून) दुपारी एका पोर्शे आणि वॅगनार चालकांमध्ये ओव्हरटेकच्या वादातून हाणामारी झाली. या घटनेमुळे काही काळ परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती आटोक्यात आणली. प्रेम वाधवाणी (३३ वर्ष, रा. हिंजेवाडी) आणि निमेश नागेश दिवाण (३८ वर्ष, रा. वाकड) या दोघांमध्ये हा वाद झाला.
रविवारी (२२ जून) दुपारी सव्वा दोनच्या सुमारास, वेस्टीन हॉटेलसमोर पोर्शे आणि वॅगनार कार यांच्यामध्ये ओव्हरटेक करण्यावरून वाद झाला. वादाचे पर्यवसान दोन्ही चालकांमधील शाब्दिक बाचाबाची आणि नंतर थेट हाणामारीत झाले.
सदर घटनेची माहिती मिळताच मुंढवा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक टापरे व मार्शल पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि दोघांनाही शांततेने बाजूला करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
दोघांनाही तक्रार नोंदवण्यासाठी मुंढवा पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले असून, या प्रकरणी पुढील चौकशी सुरू आहे. पोलिसांनी दोन्ही वाहनांची तपासणी केली असून, घटनास्थळावर सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध आहे की नाही, याचीही चौकशी सुरू आहे.